घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर रात्री ८:२० ते ८:४० च्या दरम्यान मेट्रोच्या प्रवासात एक साधा प्रसंग घडला, ज्याने सर्व प्रवाशांच्या मनात विचारांचे काहूर माजवले. डब्बा क्रमांक 051D प्रवाशांनी खचाखच भरला होता. एक चिमुकली अचानक, “गणपती बाप्पा मोरया!” असा नारा देताच डब्यातील वातावरण बदलले. प्रवाशांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले; काहीजण गालातल्या गालात हसू लागले, काहींनी तिच्याकडे कौतुकाने पाहिले तर काहीजण तिच्या आईकडे विचित्र नजरेने बघू लागले. तिच्या आईच्या चेहऱ्यावर थोडी भीती, तर थोडं दीर्घश्वास टाकणारं हास्य झळकत होतं.
पण हा प्रसंग अधिक वेगळा ठरला तेव्हा तिच्या वडिलांचा आवाज आला – “चूप!” त्या आवाजाने सर्वांच्या नजरा वळल्या. ती व्यक्ती मुस्लिम समाजातील वेशभूषेत होती, ज्यामुळे प्रसंगाला आणखी गंभीर वळण मिळाले. तरीही ती चिमुकली परत एकदा “गणपती बाप्पा मोरया” म्हणाली. या वेळी पुन्हा प्रवाशांचे लक्ष तिच्या आई आणि वडिलांकडे होते. त्यांना त्या क्षणी काय वाटलं असेल, हे त्या चेहऱ्यांवरून स्पष्ट होत होतं.
या साध्या पण महत्त्वपूर्ण प्रसंगाने आपल्याला एका मोठ्या मुद्द्याकडे वळवलं आहे – समाजातील धर्माच्या आधारावर होणारी विभाजन. जर हा नारा एखाद्या हिंदू मुलीने दिला असता, तर त्याच्याकडे कदाचित तितक्या तीव्रतेने पाहिलं गेलं नसतं. का असं होतं की धर्मानुसार आपल्याला एका चिमुकल्या मुलीच्या निष्पाप उत्साहाला वेगळं भान येतं?
आजच्या सोशल मीडिया युगात, लहान मुलं विविध व्हिडिओ पाहतात, त्यातून त्यांच्यावर संस्कार होतात. कदाचित ती मुलगीही अशाच कुठल्या व्हिडिओमधून हा नारा शिकली असेल, आणि तिने ते मनापासून व्यक्त केलं. यात गैर काहीच नाही. ती धर्मापलीकडे जाऊन आनंदाचा आणि भक्तीचा नारा देत होती. मात्र, आपल्या समाजाने धर्माच्या आधारावर तयार केलेल्या भिंती तिच्या निष्पाप भावनेला कदाचित प्रश्नांकित करतात.
भारतीय नागरिक म्हणून आपल्याला असा विचार करायला हवा की, मुलांच्या या स्वाभाविक वर्तनात धर्म पाहणं कितपत योग्य आहे? आपण सर्वांनी एकत्र राहून आपल्या मुलांना कोणत्याही भेदभावाशिवाय वाढवायला हवं. धर्माच्या सीमारेषा पार करून एका चिमुकल्या मुलीने केलेली ती घोषणा आपल्याला या संधीची जाणीव करून देते – माणुसकीचा नारा कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे.
धर्माचे बंधन समाजाने ठरवलेले असले तरी मुलांची निष्पापता आणि त्यांचा आनंद यापेक्षा मोठं काहीच नाही.
यालाच तर म्हणतात सर्व धर्म समभाव देश माझा
खरंय,ही न्यूज वाचून "वर्तमान धर्म" हा शब्द खरचं एवढा प्रभावित आणि सत्य परिस्थिला गंभीर विचार करण्यासारखा आहे असे वाटते, कारण भारतात एवढ्या जाती – धर्म आहेत की जो तो आपापल्या धर्माशी एकनिष्ट राहण्यासाठी प्रयत्न ही करतोच पण आपल्या परीवाराला ही त्या रेषेत बांधण्याचा प्रयत्न किंवा संस्कार ही देतो पण लहान मुलांबद्दल ही रेष मिटवणे काळाची गरज आहे. किंबहुना पुढील आयुष्यात त्यांनी माणसाला धर्म म्हणून नव्हे तर माणूस म्हणून बघावे ही अपेक्षा