लोकसभा निवडणुकीपासूनच तापलेला आरक्षणाचा मुद्दा आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी चिघळला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी यापूर्वी सरकारला कडक इशारा दिला होता की, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यांची मागणी मान्य करावी. परंतु सरकारने निर्णय न घेतल्याने जरांगे यांनी महायुती सरकारला मोठं आव्हान दिलं आहे.
यावर प्रतिक्रिया देत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही स्वतःचा पवित्रा अधिक कडक केला आहे. त्यांनी जाहीर केलं की, मनोज जरांगे ज्यांना पाठिंबा देतील, त्याच्याविरोधात ओबीसी मतदार उभे राहतील. हाके यांनी म्हटलं की, “आम्ही ओबीसींना निवडून आणण्यासाठी लढणार आहोत. जे आमदार ओबीसींच्या हक्कांसाठी काम करत नाहीत, त्यांना विधानसभेत जाण्यापासून रोखण्याची आमची रणनीती आहे.”
हाके यांनी पुढे असेही म्हटले की, “महाराष्ट्रातील ओबीसींना विधानसभेत योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही. पक्षीय राजकारणात ओबीसींचा केवळ मतांसाठी वापर होत आहे. या निवडणुकीत आम्ही ओबीसींना तिकीट देणाऱ्या पक्षांचं समर्थन करू, अन्यथा त्यांना पराभूत करू.”
जरांगे यांच्या समर्थनार्थ उमेदवार उभे राहिल्यास ओबीसी मतदार त्यांना विरोध करतील, अशी भूमिका घेत हाके यांनी जरांगे गटाविरोधात आपली लढाई तीव्र केली आहे.