आज फलटणमध्ये झालेल्या मोठ्या सभेत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. या प्रसंगी खासदार शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली, विशेषतः ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’वरून सरकारला लक्ष्य केले.
शरद पवार म्हणाले, “मी मागच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते यांच्या सभेसाठी आलो होतो, तेव्हा तुमच्या चेहऱ्यांवर निराशा होती, पण आता तुमचं आत्मविश्वासपूर्ण चेहऱ्यांवरून तुमच्या मनातील आशा दिसत आहे. फलटण आणि बारामतीचे संबंध अनेक वर्षांचे आहेत आणि त्या संबंधांचा आदर केला पाहिजे.”
फलटणच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण
शरद पवारांनी फलटणच्या ऐतिहासिक योगदानाचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावर नेण्यासाठी पहिला ठराव फलटणमध्येच झाला होता. मराठी लोकांच्या सन्मानासाठी हे राज्य उभं करण्यात फलटणचं मोठं योगदान आहे, जे विसरता येणार नाही.”
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर निशाणा
पवारांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वर खोचक टीका करत म्हटले, “या सरकारला बहीण आता का आठवली आहे? दहा वर्षांमध्ये बहिणींची आठवण कधीच आली नाही, पण आता अचानक निवडणुकांच्या आधी बहिणीसाठी योजना आणली जात आहे. यापूर्वीच्या काळात बहीण दिसली नव्हती, पण लोकसभा निवडणुकांमध्ये ३१ जागा हरल्यानंतर यांना बहिण आठवली.”
या भाषणातून शरद पवारांनी महायुती सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आगामी निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणीची तयारी दर्शवली.