प्रतिनिधी : रामदास चव्हाण
रायगड : महाड तालुक्यातील आसनपोई ग्रामपंचायत सरपंच पूजा खोपडे आणि प्रवीण खोपडे यांना शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती काल उपतालुकाप्रमुख यांनी एका प्रसारमाध्यमाला दिली. आसनपोई गावच्या ग्रामस्थांनी गाव पातळीवर सरपंचाची नेमणूक केली होती. तथापि, ऐन निवडणुकीच्या तोंडावरच पक्ष फोडाफोडीचं राजकारण जोरात सुरू झाले आहे.
गावच्या सरपंचांनी पक्षाविरोधी कारवाया व संघटनेचे विचार सोडून दिले असल्यामुळे हि कारवाई करण्यात आल्याचे उपतालुकाप्रमुख यांनी सांगितले. परंतु, सरपंच पूजा खोपडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत विरोधकांना ठणकावून सांगितले, “मी आणि माझे पती 15 वर्षापासून शिवसेनेचे निष्ठेने काम करीत आहोत. त्यामुळे शिवसेनेशी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना माझी हकालपट्टी करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. ते गद्दार आहेत आणि गद्दारच राहतील.”
तसेच, उपसरपंच राजेश जाधव यांनी सांगितले की, “येणाऱ्या निवडणुकीत महिला शक्ती ही विरोधकांना त्यांची योग्य ती जागा दाखवून देतील.” यावेळी आसनपोई उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.