नवी दिल्ली: देशातील सर्वोच्च न्यायालयात बुधवारी न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली असून, तिच्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या मूर्तीवरून डोळ्याची पट्टी काढून तलवारीऐवजी एका हातात भारतीय संविधान ठेवण्यात आले आहे. यामुळे कायदा आंधळा नसल्याचा आणि संविधानावर आधारित असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निर्देशानुसार हे बदल झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वाचनालयात बसवलेल्या या नव्या मूर्तीने देशभरात चर्चा सुरू केली आहे. न्यायदेवतेच्या पारंपरिक प्रतिमेत डोळ्यांवर पट्टी, एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार असते. मात्र, नव्या मूर्तीत न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढून संविधानाचा स्वीकार केल्याने न्यायसंस्थेच्या बदलत्या दृष्टिकोनाचा संदेश दिला जात आहे.
या नव्या मूर्तीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) संस्थापक शरद पवार यांनी सरन्यायाधीशांच्या निर्णयाचे कौतुक केले. सांगलीत बोलताना त्यांनी सांगितले, “या पुतळ्याद्वारे सरन्यायाधीशांनी एक नवीन दिशा दिली आहे. हा विचार या देशात कधी झाला नव्हता तो त्यांनी मांडला आहे.”
नव्या मूर्तीचे वैशिष्ट्य
नवीन न्यायदेवतेच्या मूर्तीचे विशेष आकर्षण म्हणजे तिच्या पारंपरिक स्वरूपात करण्यात आलेले बदल. या मूर्तीमध्ये ती भारतीय साडी परिधान करून आहे आणि तिच्या डोक्यावर मुकुट आणि कपाळावर टिकली आहे, ज्यामुळे तिच्या रूपाला भारतीय पारंपरिक स्वरूप दिलं गेलं आहे. एका हातात तराजू आहे, जो न्यायाचे प्रतीक आहे, तर दुसऱ्या हातात तलवारीऐवजी भारतीय संविधान आहे.
हा बदल देशाच्या न्यायव्यवस्थेतील बदललेल्या विचारसरणीचे प्रतीक मानला जातो, ज्याद्वारे कायदा आंधळा नसून, भारतीय संविधानाच्या आधारे निर्णय घेतले जातात, असं प्रतिपादन करण्यात आलं आहे.