केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या घटनाक्रमाला प्रत्युत्तर म्हणून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस मुख्यालयावर हल्ला केला. कार्यालयातील खुर्च्या तोडण्यात आल्या, शाहीफेक आणि दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “हे भाजपचे कार्यकर्ते नसून पोसलेले गुंड आहेत. आम्हीही आंदोलने केलीत, पण हिंसेचा मार्ग कधीही स्वीकारला नाही. काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करून खुर्च्या फोडल्या जात असतील आणि जीव घेण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर हे गंभीर आहे.”
दलितांवर अन्याय, कार्यकर्त्यांची हिंमत वाढल्याचा आरोप
वडेट्टीवार पुढे म्हणाले, “राज्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णतः बिघडली आहे. परभणीत दलित बांधवांवर अन्याय झाला. सरपंच संतोष देशमुख यांचा बळी गेला. सत्ता आल्यापासून भाजपच्या कार्यकर्त्यांची हिंमत वाढली आहे, विरोधकांच्या कार्यालयांवर हल्ले होत आहेत.”
मुख्यमंत्री साहेब, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे ?
इथे तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आता गुंड बनून काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ले करायला लागले. pic.twitter.com/NN4uSX9qus
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 19, 2024
भाजयुमोच्या आंदोलनावर टीका
वडेट्टीवार यांनी भाजयुमोच्या कृतीवर टीका करत सांगितले, “ते बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन आले. आम्हाला वाटलं, ते आमच्यासोबत आहेत, पण प्रतिमा बाजूला ठेवून त्यांनी कार्यालयावर हल्ला केला. हे गुंडगिरीचं लक्षण आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणं महत्त्वाचं आहे, हिंसा नव्हे.”
अमित शाहांवर आरोप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याबद्दल अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना वडेट्टीवार म्हणाले, “संविधानामुळेच देशातील प्रत्येकाला अधिकार मिळाले आहेत. बाबासाहेबांचा अपमान कोणीही सहन करणार नाही. आंदोलन हे लोकशाही मार्गानेच व्हावं.”
पोलीस यंत्रणेवरही सवाल
“कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली परभणीत माणसांचे जीव घेतले जात आहेत. पोलिसांच्या सूचनांवर कोणाचा प्रभाव आहे? पोलिसांवर काय कारवाई केली जाणार?” असे सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केले.
काँग्रेसने या प्रकरणावर कठोर भूमिका घेत, पुढील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.