
– अपूर्ण घरकुलांसाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश
– भूमिहीन लाभार्थ्यांना गायरान, गावठाण जमिनीवर घरकुल उपलब्ध करून देणार
– प्रत्येक तालुक्यात ‘उमेद मार्ट’ विक्री केंद्र स्थापन होणार
अमरावती, दि. 6 – प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) टप्पा दोन अंतर्गत अमरावती विभागाला 3 लाख 16 हजार 339 घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यापैकी 2 लाख 69 हजार 61 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. समाजातील प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी घरकुलांची कामे गतीने पूर्ण करून उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत त्यांनी अमरावती विभागातील आवास योजनांचा आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, अपर आयुक्त गजेंद्र बावणे तसेच अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
अपूर्ण घरकुलांसाठी वेगवान अंमलबजावणी करण्याचे निर्देश
गोर-गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी घरकुलांची कामे गतीने पूर्ण करावीत, असे मंत्री गोरे यांनी सांगितले. 2022 अखेर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एकमध्ये 20,594 घरकुले अपूर्ण राहिली असून टप्पा दोनमध्ये 2,69,061 घरकुले अपूर्ण आहेत. त्यामुळे तालुका व ग्रामस्तरावर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून अडथळे दूर करावेत आणि घरकुल योजनांच्या जमिनीसंबंधीच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
गायरान आणि गावठाण जमिनीवर घरकुल उभारणीसाठी शासनाने परवानगी दिली असून, भूमिहीन लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, घरकुल बांधणीसाठी वाळू, वीटा आणि सिमेंट सहज उपलब्ध होण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात यावीत.
‘उमेद मार्ट’ विक्री केंद्र स्थापन होणार
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी ‘लखपती दिदी योजना’ प्रभावीपणे राबवावी, असे मंत्री गोरे यांनी सांगितले. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांमार्फत कर्जपुरवठा करण्यात यावा. त्याचबरोबर तालुका आणि ग्रामपातळीवर ‘उमेद मार्ट’ विक्री केंद्र स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
ग्रामपंचायत विकास आराखड्याचा आढावा
बैठकीत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा 2025-26, पंचायत लर्निंग सेंटर्स, 15 वा वित्त आयोग निधी आणि ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस विकास आराखड्यांतर्गत ग्रामविकास विभागात झिरो पेंडन्सी, गोरगरीब आणि महिलांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन मंत्री जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्यांना केले.