ढाका: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद (Hafiz Saeed) याने पुन्हा एकदा भारताविरुद्ध नवा कट रचण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. हाफिज सईदचा एक अत्यंत जवळचा सहकारी आणि पाकिस्तानी मौलाना सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून, त्याच्या भारत-बांगलादेश सीमेवरील संशयास्पद हालचालींमुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ईशान्य भारताला अस्थिर करण्याचा हा मोठा कट असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘मरकजी जमीयत अहल ए हदीस’चा महासचिव इब्तिसाम इलाही जहीर (Ibtisam Ilahi Zaheer) हा २५ ऑक्टोबर रोजी बांगलादेशात दाखल झाला. या दौऱ्याला धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न होत असला, तरी प्रत्यक्षात तो हाफिज सईदचा नापाक डाव पुढे नेण्यासाठी आल्याचे बोलले जात आहे.
सीमेवरील ‘त्या’ हालचालींनी वाढवली चिंता
इब्तिसाम इलाही जहीर २५ ऑक्टोबरला राजशाहीच्या शाह मकदूम विमानतळावर उतरला. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी त्याने थेट भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या चपैनवाबगंज भागाचा दौरा केला. शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर आणि मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आल्यानंतर जहीरचा हा दुसरा बांगलादेश दौरा आहे, ज्यामुळे संशय अधिक बळावला आहे.
सूत्रांच्या मते, जहीरने सीमेवरील स्थानिक मशिदींमध्ये अनेक गुप्त बैठका घेतल्या आहेत. त्याचा हा दौरा केवळ चपैनवाबगंजपुरता मर्यादित नाही, तर तो पुढे सीमेवरील अनेक संवेदनशील भागांना भेटी देणार आहे.
जहीरचा पुढील दौरा आणि भारताची डोकेदुखी
- २९-३१ ऑक्टोबर: रंगपूर, लालमोनिरहाट आणि निलफामारी (भारत सीमेला लागून असलेले भाग)
- १-२ नोव्हेंबर: जॉयपुरहाट आणि नागाव
- ६-७ नोव्हेंबर: राजशाही येथे सलाफी संमेलनाला संबोधन
जहीर हा एक कट्टर इस्लामी मौलाना असून, तो त्याच्या विषारी आणि बिगर-मुस्लिमांविरोधी हिंसक भाषणांसाठी कुप्रसिद्ध आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील बहुतांश सीमा खुली असल्याने, या दौऱ्याचा वापर तरुणांचे ‘ब्रेनवॉश’ करण्यासाठी आणि भारतात घुसखोरी करण्यासाठी होऊ शकतो, अशी भीती गुप्तचर यंत्रणांना आहे.
‘आयएसआय’चा जुनाच कट पुन्हा सक्रिय?
पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) ईशान्य भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहे. बांगलादेशातील सत्तांतरानंतर हाफिज सईद (Hafiz Saeed) आणि आयएसआय पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. जहीरच्या या दौऱ्यामागे ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता पसरवण्याचे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता आहे. बांगलादेशी गुप्तचर यंत्रणाही जहीरच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
धार्मिक कार्यक्रमांच्या आडून हाफिज सईदचा हस्तक सीमेवर पोहोचल्याने भारतासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. या संशयास्पद दौऱ्यावर भारत सरकार आणि संबंधित सुरक्षा यंत्रणा कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात आणि पुढील धोका टाळण्यासाठी कोणती पाऊले उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.







