महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालांनंतर सत्ता वाटपाच्या टप्प्यांवरून सुरू झालेली नाराजी अजूनही शांत झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या नाराजीचा सूर उघडपणे मांडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
आज सकाळी छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. ‘सागर’ बंगल्यावर झालेल्या या बैठकीत भुजबळांनी आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी या मागण्यांवर आठ ते दहा दिवसांत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं.
यासंदर्भात संध्याकाळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी भुजबळांच्या नाराजीवर भाष्य केलं. “छगन भुजबळ हे महायुतीचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान तिन्ही पक्षांमध्ये आहे. महायुतीच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा आहे,” असं सूचक विधान फडणवीसांनी केलं.
अजित पवार आणि भुजबळ यांच्या मतांमध्ये मतभेद?
फडणवीसांनी अजित पवारांच्या विधानाचाही उल्लेख केला. “भुजबळांना मंत्रीपद नाकारण्यामागे त्यांना डावलण्याचा हेतू नव्हता. अजित पवारांच्या मते, भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पुढे पाठवायचं होतं,” असं त्यांनी सांगितलं. मात्र, भुजबळांच्या अपेक्षा आणि अजित पवारांच्या विचारांमध्ये थोडं मतभेद असल्याचं त्यांनी सूचित केलं.
भुजबळांच्या नाराजीवर तोडगा कधी?
“भुजबळांसारखा नेता महायुतीत राहिलाच पाहिजे. आम्ही सगळे मिळून यावर तोडगा काढू,” असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. पालकमंत्रीपदांच्या वाटपावरून सुरू झालेला हा वाद कधी आणि कसा थांबतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.