मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. मुंबई महानगरपालिकेने गोवंडी येथे ५०० कोटी रुपये खर्चून बांधलेले शताब्दी रुग्णालय (Shatabdi Hospital) पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) तत्त्वावर अजित पवारांचे नातेवाईक असलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या ‘तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ला देण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मुंबई महापालिकेने (BMC) गोवंडी परिसरात सर्वसामान्य नागरिकांसाठी ५८० खाटांचे अद्ययावत शताब्दी रुग्णालय उभारले आहे. यासाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे रुग्णालय आता PPP तत्त्वावर चालवण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या, ज्यामध्ये एकूण तीन संस्थांनी रस दाखवला. यापैकी एक संस्था ‘तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ आहे, जिने या रुग्णालयासाठी बोली लावली आहे.
‘तेरणा ट्रस्ट’ आणि पवारांचे नाते काय?
अंजली दमानिया यांनी आरोप केला आहे की, हा सगळा प्रकार अजित पवारांच्या नातेवाईकांना फायदा पोहोचवण्यासाठीच सुरू आहे. ‘तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ हा धाराशिवचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचा आहे. पद्मसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे सावत्र बंधू आहेत.
सध्या या ट्रस्टचा कारभार पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आणि भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील पाहतात. राणा जगजीतसिंह पाटील हे अजित पवारांचे पुतणे (भाचा) आहेत. याच नात्यावर बोट ठेवत दमानिया यांनी हा ५०० कोटींचा आयता दवाखाना नातेवाईकांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून केला आहे.
दमानियांचा फडणवीसांवरही निशाणा
अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “याच रुग्णालयाच्या जवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) एक रुग्णालय बांधत आहे आणि हे तयार रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केलं जात आहे. मुख्यमंत्री फडणवीसजी, तुम्ही एक काम करा, एकदाचा अख्खा महाराष्ट्र या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा.”
आता आणि एक ५०० कोटीची हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना ?
शताब्दी हॉस्पिटल हे एक ५८० बेड चे हॉस्पिटल, BMC ने बांधले. विरोध असतांना देखील PPP तत्वाने देण्याचा घाट घातला आणि योगायोगाने ह्यात पद्मसिंह पाटील ह्यांच्या तेरणा पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट ने bid केले आहे.
ह्याच्याच… pic.twitter.com/H1GejwT3bN
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 17, 2025
यापूर्वीचा ‘तो’ जमीन व्यवहार
अंजली दमानिया यांनी यापूर्वीही पवार कुटुंबावर आरोप केले होते. काही काळापूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीमार्फत पुण्यातील मुंढवा येथे ४० एकर जमीन खरेदी करण्याचा व्यवहार सुरू होता. या व्यवहारात घोटाळा असल्याचा आरोप दमानिया यांनी केल्यानंतर पार्थ पवार यांना त्या व्यवहारातून माघार घ्यावी लागली होती. त्या प्रकरणाची आठवणही या निमित्ताने पुन्हा एकदा झाली आहे.
या प्रकरणावर पुढे काय?
गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय हे गोरगरिबांच्या उपचारासाठी महत्त्वाचे केंद्र ठरू शकते. मात्र, आता या PPP मॉडेलवरून आणि दमानियांच्या आरोपांमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. या आरोपांवर पवार कुटुंब किंवा भाजप-राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते आणि या रुग्णालयाचे भवितव्य काय ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







