Breaking
21 Nov 2024, Thu

13 प्रधानमंत्री आणि 12 मुख्यमंत्र्यांच्या सभेची साक्षीदार असलेली, जिंतूर अग्निशामक दलाची राज्यातील सर्वात जुनी गाडी

परभणी जिल्ह्यात तालुका स्तरावर स्थापन करण्यात आलेले एकमेव फायर स्टेशन म्हणून जिंतूरची ओळख आहे. सन 1988 साली तालुका स्तरावर या फायर स्टेशनची स्थापना करण्यात आली. या फायर स्टेशनला लाभलेली एकमेव गाडी TATA 1210 1988 पासून म्हणजे गत 36 वर्षांपासून जिंतूरला अग्निशामक सेवा पुरवित आहे. सद्यस्थितीत ही गाडी सेवानिवृत्त होण्याला आली असून जिंतूर अग्निशामक दलाला आता नव्या गाडीची नितांत आवश्यकता भासत आहे.

अधिक माहिती अशी की, सन 1988 साली परभणी हिंगोली संयुक्त जिल्हा असताना जिंतूर मध्ये तालुकास्तरावर अग्निशामक दलाची स्थापना करण्यात आली. तेंव्हा 4500 लिटर पाणी साठवणूक क्षमता असलेली टाटा 1210 मॉडेलची गाडी शासनाने उपलब्ध करून दिली. या गाडीने जिंतूर तालुक्यासह परभणी हिंगोली जिल्ह्यात सेवा पुरवल्याची माहिती आहे. आपत्कालीन परिस्थितीत सदरील गाडीने हिंगोली परभणी जालना कळमनुरी लातूर परतुर अंबड या ठिकाणावर सेवा पुरवली आहे. मागील काही वर्षांपासून अग्निशामक दलाने जिंतूर नगर परिषद कार्यालयाकडे किमान 25 वेळा नवीन गाडीची मागणी केली आहे,आजवरचे सर्व आजी माजी आमदार आणि प्रशासक यांना देखील नविन गाडीसाठी साकडे घालण्यात आले परंतु कुणाकडूनही याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. याउलट हिंगोली परभणी परळी वैजनाथ पाथरी वसमत याठिकाणी दोन वेळा नवीन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. परंतु जिंतूर ला 36 वर्षांपासून एकच गाडी तालुक्याची आग विझवत आहे. बहुदा महारष्ट्र राज्यातील सर्वात जुनी गाडी म्हणून जिंतूर अग्निशामक दलाच्या गाडीची नोंद असावी. चार दशकांत झालेल्या सात पंचवार्षिक निवडणुकीच्या सर्व पक्षांच्या सभेला बंदोबस्तात या गाडीची हजेरी लागत आली आहे. राज्याचे सात मुख्यमंत्री पाहिलेली ही गाडी मोरारजी देसाई पासून ते नरेंद्र मोदींच्या सभेची साक्षीदार राहीली आहे. प्रदीर्घ शासनसेवा दिलेली गाडी आता कधी सेवानिृवृत्त होणार याची जिंतूर अग्निशामक दलाला प्रतीक्षा आहे. सद्या जिंतूर अग्निशामक दलात एकूण पाच लोक अत्यावश्यक सेवा देण्यासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. यात विभागप्रमुख म्हणून चत्रू राठोड चालक मुजाहेद बेग मिर्झा, फायरमन सोनाजी गायकवाड, बाबाराव रोकडे आणि आर आर जाधव हे कर्मचारी रुजू आहेत. पुढील काही दिवसांत जिंतूर अग्निशामक दलात नवीन भरती झालेली उमेदवार सेवा देण्यासाठी रुजू होणार आहेत.

🔴केवळ गाडी नाही, ही तर जिंतूर न.प.ची लक्ष्मी आहे

जिंतूर तालुका लोकसंख्या विचार करता आजघडीला किमान दोन गाड्यांची आवश्यकता आहे. 36 वर्षांपासून सेवा पुरवणाऱ्या गाडीने आपत्कालीन परिस्थितीत आजपर्यंत कधीच दगा दिलेला नाही. आजवर या गाडीचे मोठे काम निघालेले नाही, टाटा मोटर्सने हे मॉडेल बंद केल्याने अधिकृत शोरुम नाही. छोटे मोठे मेंटनंस जिंतूर मध्येच कार्यालयाकडून करण्यात येते, गाडीची पाणी टाकी मजबूत आहे परंतु गाडीचा पत्रा बाहेरून सडला आहे. त्यामुळे नवीन गाडी असणे गरजेचे आहे. असे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

🔴 असे आहेत अग्निशामक सेवा दर…

ज्यांना सामाजिक कार्यक्रम आणि राजकीय सभा स्थळी अग्निशामक दलाची आवश्यकता आहे त्यांनी, न.प. कार्यालयात 48तास आधी मागणी अर्ज करावा लागतो. पहिल्या तीन तासासाठी चार हजार रुपये व त्यापुढे प्रती तास एक हजार रुपये शुल्क अग्निशामक कर म्हणून भरावा लागतो. शासकीय बंदोबस्ताला मात्र मोफत सेवा दिली जाते. आपत्कालीन परिस्थितीत पूर्वी 02457/237041 हा क्रमांक लावावा लागत होता. परंतु थकीत बिलामुळे तो नंबर बंद असल्याचे सांगितले आहे. आपत्कालीन परिस्थितीत सद्या कार्यरत असलेल्या पाच कर्मचाऱ्यांच्या मोबाईल फोनवर संपर्क साधावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *