नाशिकमध्ये ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात एक अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण सोहळा सुरू असताना, भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने एका महिला कर्मचाऱ्याने थेट पालकमंत्री गिरीश महाजन (Girish-Mahajan) यांना भर कार्यक्रमात जाब विचारला. या घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

                Swarashtra Maza App

🚨 ताज्या अपडेटसाठी App Install करा
बातमी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर
Install

नक्की काय घडले?

प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमधील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री गिरीश महाजन (Girish-Mahajan) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना महाजन यांनी नाशिकमधील आगामी कुंभमेळा, विकासकामे आणि प्रस्तावित प्रकल्पांची माहिती दिली. मात्र, आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नाही, असा आरोप उपस्थित असलेल्या वन विभागाच्या एका महिला कर्मचाऱ्याने केला.

भाषणादरम्यान या महिलेने आक्रमक पवित्रा घेत गिरीश महाजन (Girish-Mahajan) यांना थेट सवाल केला. “ज्यांनी देशाला संविधान दिले, त्यांची आठवण तुम्हाला भाषणात का झाली नाही? लोकशाहीशी संबंध नसलेल्या लोकांची नावे वारंवार घेतली जातात, मग बाबासाहेबांचे नाव का नाही?” असा संतप्त प्रश्न तिने उपस्थित केला.

“निलंबित करा, पण माफी मागणार नाही”

या गदारोळानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, तिने आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली. ती म्हणाली, “मला वाळूच्या गाड्या उतरवायचे काम दिले तरी चालेल, पण मी बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. मंत्र्यांनी आपली चूक मान्य करावी. मला निलंबित केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही.”

गिरीश महाजन (Girish-Mahajan) यांनी आपल्या भाषणात नाशिकच्या रिंग रोड आणि पर्यटन विकासावर भर दिला होता, परंतु या अनपेक्षित व्यत्ययामुळे कार्यक्रमात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधित महिला कर्मचाऱ्याला कार्यक्रमस्थळावरून बाजूला नेले. या घटनेची सध्या नाशिकसह संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.