नागपूर: राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी झडताना दिसत आहेत. नुकतेच विधानसभेत बोलताना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सत्ताधाऱ्यांचा उल्लेख ‘शिंदे सेना’ असा केला. या उल्लेखावर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी तीव्र आक्षेप नोंदवत वरुण सरदेसाईंना खडे बोल सुनावले. हा प्रकार सभागृहात चांगलाच गाजला.
वरुण सरदेसाईंच्या वक्तव्यावर आक्षेप
विधानसभेत विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला उद्देशून ‘शिंदे सेना’ (Shinde Sena) हा शब्द वापरला. हा शब्द कानी पडताच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई जागेवरून ताडकन उठले आणि त्यांनी पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला. वरुण सरदेसाईंनी वापरलेल्या शब्दावलीवर हरकत घेत देसाई यांनी त्यांना संविधानाची आणि निवडणूक आयोगाच्या निकालाची आठवण करून दिली.
“आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही”
सभागृहात संताप व्यक्त करताना शंभूराज देसाई म्हणाले की, “विरोधक वारंवार आमचा उल्लेख शिंदे सेना असा करत आहेत. पण, आम्ही कोणतीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा खाजगी सेना नाही. देशाच्या निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृतपणे ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह बहाल केले आहे.”
यावेळी शंभूराज देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेत, जर निवडणूक आयोगाने मान्यता दिली असेल, तर विरोधकांनी त्यांचा उल्लेख ‘शिवसेना’ असाच केला पाहिजे, असा आग्रह धरला. तसेच, सभागृहाच्या कामकाजातून ‘शिंदे सेना’ हा शब्द वगळण्याची मागणीही त्यांनी केली.
या प्रसंगामुळे विधिमंडळात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतरही नावावरून सुरू असलेला हा वाद भविष्यातही असाच धुमसत राहणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.






