मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट आणि गंभीर इशारा दिला आहे. मुंबईतील वरळी येथे झालेल्या ‘निर्धार मेळाव्यात’ बोलताना, मतदारयाद्यांमधील घोळ आणि बोगस मतदारांच्या मुद्यावरून त्यांनी निवडणूक आयुक्तांवर सडकून टीका केली. “आमचं सरकार आल्यानंतर आम्ही निवडणूक आयुक्तांवर खटला भरणार,” असा उद्धव ठाकरेंचा इशारा सध्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरला आहे.
भाजपवर ‘बोगस टोळी’ म्हणून टीका
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावरही जोरदार हल्ला चढवला. “भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशभक्तांची बोगस टोळी आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, “स्वत:ला आत्मनिर्भर म्हणवतात, पण त्यांना पक्ष फोडावे लागतात, लोक चोरावे लागतात आणि मतेही चोरावी लागतात. हे कसले आत्मनिर्भर?”
यावेळी त्यांनी महायुतीला खुलं आव्हान देत, “तुम्ही मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानात या आणि नसाल तर मतचोरी करून या,” असेही सुनावले.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संशय व्यक्त केला. “ईव्हीएममधील गडबडीचा संशय अजूनही गेलेला नाही. त्यातच आता महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट (VVPAT) देखील ठेवणार नसल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. मग या निवडणुका कशासाठी घेणार?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
बोगस मतदार मतदान करून निघून जाणार आणि आयोग त्यांना हवे तसे निर्णय देणार का? असा प्रश्न विचारत, उद्धव ठाकरेंचा इशारा अधिकच तीव्र झाला.
“आयुक्तांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे”
कायद्यासमोर सर्व समान आहेत, या तत्त्वाची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही गुन्हा केला तर कायद्याच्या कचाट्यात सापडतो, मग निवडणूक आयुक्तांनी चूक केल्यास त्यांनाही सजा झालीच पाहिजे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की, निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवरही केस (गुन्हा) दाखल झाली पाहिजे.”
“आमचं सरकार आल्यावर…” – अंतिम इशारा
भाषणाचा रोख अधिक आक्रमक करत उद्धव ठाकरे यांनी थेट इशारा दिला. ते म्हणाले, “पुढच्या लोकसभेला अद्याप वेळ आहे. आत्ता त्यांचे दिवस असतील, पण ते चोरून घेतलेले आहेत. उद्याचे दिवस आमचे असणार आहेत. एकदा आमचं सरकार आलं, तर आम्ही निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करून त्यांना न्यायालयासमोर उभं करू,”. उद्धव ठाकरेंचा इशारा हा केवळ राजकीय टीका नसून, भविष्यातील कायदेशीर कारवाईची धमकी मानली जात आहे.







