जगात कुठेही युद्ध किंवा लष्करी संघर्ष सुरू झाला की त्याचा पहिला आणि मोठा फटका त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बसतो. पश्चिम आशियात इराणसोबत सुरू असलेल्या वाढत्या संघर्षामुळे सध्या जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत बेरोजगारी वाढली असून महागाईने धोक्याची घंटा वाजवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिका संकटात सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे. इराणसोबतच्या या तणावामुळे अमेरिकेत नोकऱ्या गमावणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, लाखो लोक सरकारी भत्त्यासाठी अर्ज करू लागले आहेत.
बेरोजगारी भत्त्यासाठीच्या अर्जांमध्ये विक्रमी वाढ
यूएस लेबर डिपार्टमेंटने (अमेरिकेचे कामगार मंत्रालय) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २३ मे २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगार भत्त्यासाठीच्या सुरुवातीच्या दाव्यांमध्ये ५,००0 ची वाढ झाली आहे. यामुळे एकूण अर्जदारांची संख्या आता २,१५,००० वर पोहोचली आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यापासूनचा हा सर्वात मोठा आकडा मानला जात आहे. सध्या सरकारी पातळीवर अनइंप्लॉयमेंट बेनिफिट्स (बेरोजगारी भत्ता) घेणाऱ्या एकूण नागरिकांची संख्या १७.९ लाखांवर गेली आहे. विशेषतः तंत्रज्ञान (Tech) क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ‘व्हाइट कॉलर’ कर्मचाऱ्यांची कपात केली जात असल्याने अमेरिकेत बेरोजगारी वाढली आहे.
महागाई ३.८ टक्क्यांवर; २०२३ नंतरचा सर्वात मोठा उच्चांक
रोजगार संकटासोबतच अमेरिकन नागरिकांना आता वाढत्या महागाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. ताज्या अहवालानुसार, अमेरिकेतील वार्षिक महागाई दर वाढून ३.८ टक्के झाला आहे, जो २०२३ नंतरचा सर्वोच्च स्तर आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या आणि ऊर्जेच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे यामागील मुख्य कारण मानले जात आहे. अमेरिकेने जगाला इंधनाचा पुरवठा करणाऱ्या भूभागावरच थेट संघर्ष सुरू केल्यामुळे भारतासह चीनसारख्या मोठ्या देशांचाही इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे.
अमेरिकन कुटुंबांवर वाढता आर्थिक ताण
‘ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्स’च्या विश्लेषक एलिझा विंगर यांच्या मते, ही आकडेवारी चिंताजनक असली तरी अमेरिकेचा लेबर मार्केट अजूनही काहीसा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, महागाई गगनाला भिडल्यामुळे सामान्य अमेरिकन नागरिकांची ‘डिस्पोजेबल इन्कम’ (खर्च करण्यायोग्य उत्पन्न) सलग तिसऱ्या महिन्यात घटली आहे. घरगुती खर्चाचा ताण वाढल्यामुळे नागरिकांची वैयक्तिक बचत थेट २०२२ नंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर आली आहे. कोरोना काळात साठवलेली पुंजी आता संपत आल्यामुळे सामान्य अमेरिकन नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.
थोडक्यात सांगायचे तर, ट्रम्प प्रशासनाच्या इराण विरोधी आक्रमक धोरणांमुळे अमेरिकेत बेरोजगारी वाढली असून ग्राहक आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला आहे. या युद्धाचा फटका खुद्द अमेरिकेला अंतर्गत पातळीवर मोठ्या आर्थिक संकटाच्या रूपाने बसत आहे. आगामी काळात जर हा संघर्ष निवळला नाही, तर अमेरिकेतील आर्थिक मंदी अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






