नशीब…, नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते…!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा 2025 : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. इंडिया टुडेने नुकत्याच जाहीर केलेल्या “मोस्ट पॉप्युलर सीएम अॅक्रॉस इंडिया” या सर्वेक्षणाचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवली.
“आपल्या वेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या पाचात यायचा. ते माझं कर्तृत्व नव्हतं, ते जनतेचं सहाय्य होतं. महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं. पण आजच्या सर्व्हेमध्ये आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत. नशीब 10 आले, नाहीतर फडणवीस म्हणून 20वे आले असते,” अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ठाकरेंनी यावेळी सर्वेक्षणातील निकाल वाचून दाखवत, “पहिल्या क्रमांकावर योगी आदित्यनाथ, दुसऱ्या क्रमांकावर ममता बॅनर्जी, तिसऱ्यावर चंद्राबाबू नायडू, चौथ्या स्थानी नीतीशकुमार, पाचव्या स्थानी स्टॅलिन, त्यानंतर पिनरई विजयन, रेवंता रेड्डी, मोहन यादव, हेमंत्ता बिस्वसरमा आणि दहाव्या स्थानावर देवेंद्र फडणवीस,” अशी यादी मांडली.
याचबरोबर राज्यातील कारभारावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले,
-
“संपूर्ण बजबजपुरी करून ठेवली आहे. काय केलंत आजपर्यंत?”
-
“अधिकाऱ्यांवर धाड टाकली जाते, अधिकारी रंगेहात पकडले जातात. पण मंत्री मात्र खोलीत बिनधास्त बॅगा उघड्या टाकून बसतात. त्यांना हात लावण्याची हिम्मत सरकारमध्ये नाही.”
-
“आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्सबार काढले जात आहेत, दारूचे परवाने दिले जात आहेत. पुरावे सादर केले तरी फडणवीस मंत्र्यांना समज देऊन सोडतात.”
उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल ऐकताना मैदानात उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून वातावरण दणाणून सोडलं.








