मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबासोबत कृतज्ञ राहायला पाहिजे होते, मात्र ते आता गरळ ओकत आहेत, असे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर काही लोक त्यांची विटंबना करत असून, याची जबर किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
संजय राऊत म्हणाले की, “ज्या माणसाला (रामदास कदम) पक्षाने १२ वर्षे विधान परिषदेवर पाठवले, विरोधी पक्षनेतेपद आणि मंत्रिपद दिले, त्यांनी अशी विधाने करताना लाज बाळगली पाहिजे. विशेषतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना भरपूर संधी दिली.”
बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या दिवसांची आठवण करून देत राऊत म्हणाले, “जेव्हा बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती, तेव्हा मी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत होतो. आम्ही काही मोजकेच लोक तिथे होतो. रामदास कदम तेव्हा कुठे होते?”
राऊत यांनी पुढे म्हटले की, “उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची आणि त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे. केवळ टाळ्या मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत, पण महाराष्ट्र त्यांच्यावर थुंकत आहे.”
या सर्व आरोपांवर अधिक माहिती देण्यासाठी आज दुपारी १२ वाजता अनिल परब यांची पत्रकार परिषद होणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. “पद आणि पैशासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, हे रामदास कदम यांनी दाखवून दिले आहे,” असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि इतर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर टीका करताना राऊत म्हणाले, “जे लोक भाजपच्या चरणी विलीन झाले आहेत आणि अमित शहांच्या ‘जोड्यांची’ शस्त्र म्हणून पूजा करत आहेत, ते कधीही बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानू शकत नाहीत.” “आम्ही अजून जिवंत आहोत आणि पुढे काय करायचे ते आम्ही पाहू,” असा इशाराही त्यांनी दिला.







