प्रतिनिधी रत्नदीप शेजावळे
जिंतूर शहरातील ट्रमाकेअर सेंटर मधील कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याचे सत्र थांबता थांबत नाही. मागील पंधरा दिवसां पूर्वीच रुग्णालयातील डॉक्टर आणि पुरुष परिचारकावर एका इसमाने हल्ला करून रुग्णालयात गोंधळ घातला होता. ही घटना ताजी असतानाच आज दि 11 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिंतूर ट्रामा केअर मध्ये कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिका वैशाली राठोड यांच्यावर अट्टल गुन्हेगार असणाऱ्या सेलू येथील इमरान कुरेशी नावाच्या तरुणाने लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत जीवघेणा हल्ला केला आहे. परिचारिका राठोड ह्या गर्भवती असल्याचे देखील कळाले आहे.
मिळालेली प्राथमिक माहिती अशी की आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परिचारिका वैशाली राठोड ह्या कर्तव्यावर असताना इमरान कुरेशी नावाचा तरुण हाताला जखम झाली म्हणून, त्यावर तात्काळ मलमपट्टी करण्यासाठी रुग्णालयात आला होता. मलम पट्टी करण्यास विलंब का करता..? असे म्हणत तरुणाने राठोड यांना अश्लील भाषेत शिव्या देत रुग्णालयात गोंधळ घालायला सुरुवात केली, त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिका राठोड त्याला मलमपट्टी करण्यासाठी गेल्या असता आरोपी तरुणाने राठोड यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीला विरोध करीत असताना आरोपीने राठोड यांचा विनयभंग करीत यांना लाथा मारायला सुरुवात केली त्यावेळी सुदैवाने त्याची लाथ गर्भवती असणाऱ्या राठोड यांच्या पोटात लागली नाही. यावेळी तिथे उपस्थित असणारे लखन राठोड यांनी त्या तरुणाला आवर घातला म्हणून पुढचा अनर्थ टळला आहे. अशी माहिती मिळत आहे.
सध्या सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरू आहे आणि जिंतूर मध्ये मात्र दुर्गा मातेचे रूप असणाऱ्या एका गर्भवती स्त्री परिचारिकेवर जीवघेणा हल्ला होतोय ही जिंतूरच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना आहे. गत दोन महिन्यात एकाच महिला डॉक्टर दोन वेळा, पुरुष डॉक्टरवर एक वेळा, पुरुष परिचारिकावर एक वेळा आणि आता पाचव्यांदा एका महिला परिचारिकेचा विनयभंग करीत जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. जिंतूर ट्रामा केअर सेंटर मध्ये डॉक्टर आणि परिचारिकेवर होणारे हल्ले हे वाढतच जात आहेत यावर परभणी जिल्हा शल्य चिकित्सक आणि स्थानिक वैद्यकीय अधीक्षक काही उपायोजना करणार का..? असा सवाल जिंतूर मधील संतप्त नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बातमी लिहीपर्यंत जिंतूर पोलिसात आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.