रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद कवठेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण करणाऱ्या अनोख्या उपक्रमांसाठी ओळखली जाते. येथे शालेय परिसरातच पिकवलेल्या धान्य आणि भाजीपाल्याचा वापर विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी केला जातो, ही राज्यातील दुर्मिळ संकल्पना आहे.

कृषी संस्कृतीचा विकास व आत्मनिर्भरता

भारत हा कृषीप्रधान देश असून, कृषी क्षेत्र हा देशाच्या प्रगतीचा आर्थिक कणा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तृणधान्य वर्ष साजरे करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद म्हणून मुख्याध्यापक माधव अंकलगे यांच्या मार्गदर्शनाखाली पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने नाचणी आणि तांदूळ लागवडीचा उपक्रम राबवण्यात आला. शाळेच्या आसपासची पडीक जमीन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून कसण्यात आली. ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी यांच्या मदतीने चांगले उत्पादन घेण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आहाराचा उपक्रम

शाळेच्या परसबागेत वांगी, मुळा, मसाल्याची झाडे, नारळ, पपई, केळी इत्यादी वृक्षसंपदा विकसित करण्यात आली आहे. तसेच, स्थानिक ग्रामस्थ सुनिता बाळकृष्ण कुरटे यांच्या जागेत विद्यार्थ्यांच्या सहाय्याने भाजीपाला पिकवला जातो. या उत्पादनांचा वापर विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात केला जातो. दर बुधवारी विद्यार्थ्यांना नाचणीची भाकरी, भाजी, भात, आमटी असा पौष्टिक आहार दिला जातो.

सामाजिक सहभाग आणि शाळेचा गौरव

शाळेत एकूण ३१ विद्यार्थी शिक्षण घेत असून, २६ पालकांनी भोजन बनविण्यासाठी आपापले दिवस ठरवले आहेत. याशिवाय शाळेला भेट देणाऱ्या पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्या झाडांना पाहुण्यांची नावे देण्याची प्रथा सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी देखील येथे वृक्षारोपण केले आहे.

शाळेच्या विविध उपक्रमांचा प्रभाव स्थानिक ग्रामस्थांवरही झाला असून, त्यांनीही शेतीकडे वळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही शाळा संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श ठरत आहे.

व्यापक उपक्रम आणि पुरस्कार

शाळेला “आदर्श शाळा पुरस्कार”, “परसबागेविषयी विशेष गौरव”, तसेच “माझी शाळा, सुंदर शाळा” अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. येथे आंबा, आवळा, चिकू, नारळ, मसाल्याची झाडे लावण्यात आली असून, आंबा आणि आवळ्याच्या लोणच्याचेही उत्पादन घेतले जाते.

याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्कार, योगासने आणि दोरीउड्या यांसारख्या शारीरिक विकास घडवणाऱ्या उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. या क्षेत्रात शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे.

पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा अभूतपूर्व सहभाग

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती धनावडे म्हणतात, “शिक्षणासोबत शेतीची आवड निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांचा बौद्धिक तसेच शारीरिक विकास घडविणे, हा आमचा उद्देश आहे.”

वाटदची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था नसून, गावच्या मातीशी नाळ जोडणारी, शेतीची गोडी लावणारी आणि पर्यावरणप्रेम वाढवणारी एक “आदर्श शाळा” आहे.


– प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी