माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी भाजपवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेट्टी म्हणाले की, बोरिवली हा काही धर्मशाळा नाही. भारतीय संविधानात एक नगरसेवक, एक विधानसभा आणि एक लोकसभा मतदारसंघ असतो. परंतु भाजप वारंवार बाहेरच्या उमेदवारांना बोरिवलीत आणते, आणि यामुळे स्थानिक जनतेच्या भावनांवर अन्याय होत आहे.
शेट्टींनी आपल्या भाषणात सांगितले की, “भाजपाने आधी विनोद तावडे, नंतर सुनील राणे आणि पीयूष गोयल यांना इथे आणले. तरीही मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो. परंतु आता पुन्हा एकदा बाहेरच्या उमेदवाराला आणून माझा अपमान केला आहे. बोरिवलीच्या जनतेने मला दीर्घकाळ साथ दिली आहे, आणि आता लोकांची भावना मला जाणवत आहे की, जर मी आता लढलो नाही, तर येत्या ५० वर्षांत इथे कुणीही स्थानिक उमेदवार उभा राहणार नाही.”
गोपाळ शेट्टींनी पुढे स्पष्ट केले की, “मी माझे संपूर्ण जीवन भाजपासाठी दिले, पण आता मला ना खासदारकी मिळाली, ना आमदारकी. त्यामुळे जनतेच्या भावनेचा आदर ठेवून, मी आता अपक्ष उमेदवार म्हणून बोरिवलीतून निवडणूक लढणार आहे.”
गोपाळ शेट्टींच्या या घोषणेने बोरिवलीत राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, भाजपासाठी हे मोठे आव्हान ठरणार आहे.