
नवी दिल्ली, दि. 6: आयुष मंत्रालयाच्या वतीने औषधी वनस्पतींच्या आरोग्यविषयक लाभांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने “सशक्त आरोग्यासाठी – शतावरी विशेष प्रजाती अभियान” सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आयुष भवन, नवी दिल्ली येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमाला वैद्य राजेश कोटेचा, सचिव, आयुष मंत्रालय, डॉ. महेश कुमार दधीच, मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (NMPB) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी नवीन पाऊल
उद्घाटन प्रसंगी श्री. प्रतापराव जाधव यांनी आयुष मंत्रालयाच्या गेल्या दहा वर्षांत झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला. तसेच, शतावरीच्या औषधी गुणधर्मांची महती पटवून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे कौतुक केले. यापूर्वी आवळा, मोरिंगा, गिलोय आणि अश्वगंधा यांसारख्या औषधी वनस्पतींवरील मोहिमा राबविण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
महिलांच्या आरोग्यासाठी शतावरीची निवड
१५ ऑगस्ट २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात “पंचप्राण” उद्दिष्टाचा उल्लेख केला होता, ज्याअंतर्गत २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या NMPB तर्फे शतावरी वनस्पतीचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्णय घेण्यात आला. शतावरी ही स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून, तिच्या उपयोगामुळे महिलांना अनेक आरोग्यविषयक फायदे मिळू शकतात.
आर्थिक सहाय्य व कृषी अर्थशास्त्र
कार्यक्रमादरम्यान डॉ. महेश कुमार दधीच यांनी शतावरीच्या औषधी व आर्थिक महत्त्वावर सविस्तर माहिती दिली. पात्र संस्थांना रु. १८.९ लाखांचे अनुदान देऊन या अभियानाला गती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी महत्त्वाची योजना
वैद्य राजेश कोटेचा यांनी औषधी वनस्पतींसंदर्भातील उपक्रम आणि “औषधी वनस्पतींच्या संवर्धन, विकास आणि शाश्वत व्यवस्थापनासाठीच्या केंद्रीय क्षेत्र योजनेचा” उद्देश स्पष्ट केला. यामुळे शेतकरी, संशोधक आणि औषधी कंपन्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
आरोग्य व औषधी वनस्पतींच्या क्षेत्रात मोठी संधी
हे अभियान औषधी वनस्पतींच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवू शकते. शेतकरी आणि उद्योजकांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतातील पारंपरिक औषधी प्रणालीच्या जागतिक स्तरावरील विकासासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.