
नवी दिल्ली, दि. ६ : मराठी माणसाने भूतकाळात दिल्लीत आपला प्रभावी ठसा उमटवलेला आहे. मात्र, बदलत्या काळात हा प्रभाव अधिक दृढ करण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. “मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली” या परिसंवादात हा विषय केंद्रस्थानी राहिला.
हा परिसंवाद ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सदन येथे सहरद संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
परिसंवादात खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अरविंद सावंत, मेधा कुलकर्णी, वैभव डांगे, ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके, तसेच केंद्रीय शिक्षण खात्याचे सचिव आनंद पाटील आणि भारतीय डाक सेवेतील अधिकारी कौस्तुभ देशमुख यांनी सहभाग घेतला. संवादक म्हणून पत्रकार प्रशांत वाघाये यांनी भूमिका पार पाडली.
मराठीचा प्रभाव आणि पुढील वाटचाल
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आपल्या पुढच्या पिढीला मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. दिल्लीतील मराठी माणसाचा सांस्कृतिक आणि सामाजिक दबदबा वाढवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.”
अरविंद सावंत यांनी “संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळापासून महाराष्ट्राने दिल्लीसह संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये मराठी अधिकाऱ्यांची संख्या वाढायला हवी,” असे स्पष्ट मत मांडले.
अमोल कोल्हे म्हणाले, “आर्थिक निर्णय घेण्याआधी सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेण्याची परंपरा पुन्हा सुरू व्हावी, जेणेकरून महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील मराठी माणसांचे प्रश्न प्रभावीपणे मांडता येतील. शिवाय, महाराष्ट्राच्या थोर महापुरुषांचा इतिहास राष्ट्रीय स्तरावर सातत्याने अधोरेखित केला जावा.”
दिल्लीतील मराठी माणसाच्या अडचणी आणि उपाय
दिल्लीतील मराठी लोकांसाठी सांस्कृतिक आणि सामाजिक सुविधा पुरवण्यासाठी ठोस प्रयत्न व्हायला हवेत, असे मत वैभव डांगे यांनी मांडले.
सुनील चावके यांनी मराठी पत्रकारांच्या अडचणींवर भाष्य करताना “मराठी पत्रकार जेव्हा दिल्लीला येतात, तेव्हा त्यांना महाराष्ट्राशी जोडणारे बंधन तुटल्यासारखे वाटते. त्यासाठी मदतीची गरज आहे,” असे मत मांडले.
केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये अधिकाधिक मराठी तरुणांची निवड होण्यासाठी आनंद पाटील यांनी वरिष्ठ मराठी अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
मराठी भाषा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची गरज
मराठी भाषा अधिक बळकट होण्यासाठी नाटक, सिनेमा आणि साहित्याला सरकारकडून अधिक पाठबळ मिळायला हवे, असे अमोल कोल्हे यांनी नमूद केले.
तर, मेधा कुलकर्णी यांनी “मराठी साहित्य व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध असावे,” असे मत व्यक्त केले.
मराठी एकतेसाठी पुढाकार आवश्यक
परिसंवादात सहभागी सर्व मान्यवरांनी “मराठी माणसाने दिल्लीत स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी सर्व राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर एकत्र येऊन कार्य करावे,” असा एकमुखी सूर व्यक्त केला.
— प्रतिनिधी