Breaking
5 Dec 2024, Thu

मतदान करण्यापूर्वी आत्मचिंतन करणे गरजेचे….

मतदान हा लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली हक्क आहे. मात्र, अनेकदा मतदार हा हक्क वापरताना आत्मचिंतन करत नाहीत, ज्यामुळे आपल्या समाजावर, व्यवस्थेवर, आणि पुढील पिढ्यांवर होणारे परिणाम दुर्लक्षित होतात. आजच्या घडीला मतदान जनजागृतीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात, तरीही मतदानाचे प्रमाण घटतेच आहे. विशेषत: शहरी भागातील उच्चभ्रू सोसायट्यांमधील नागरिक मतदान टाळतात, ज्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळत असतात, तर दुसरीकडे सामान्य नागरिक मात्र आवश्यक मूलभूत सुविधांसाठी देखील झगडत असतात.

खरेतर, जे नागरिक खरोखरच मतदान करतात त्यांनाच पाणी, रस्ते, आरोग्य सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवांपासून वंचित राहावे लागते. लोकप्रतिनिधी सहज उच्चभ्रू नागरिकांच्या भेटीला जातात, पण सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. हा फरक पाहता, खरे विश्वगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समान मतदान अधिकार जणू केवळ मत घेण्यापुरता राहिला आहे. एकदा मतदान झाल्यावर मतदाराला लोकप्रतिनिधींकडून साधी भेटदेखील मिळत नाही.

ग्रामीण किंवा शहरी भाग, दोन्हीकडेच आज अशी स्थिती आहे की, पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींची संपत्ती 10 पट वाढते, परंतु त्या भागातील नागरिकांच्या समस्यांचे मात्र काहीच निराकरण होत नाही. खराब रस्ते, दुर्लक्षित सरकारी दवाखाने, वाढलेले शैक्षणिक खर्च यामुळे सामान्य माणसाचे जीवन दिवसेंदिवस कठीण होत आहे. कोणताही राजकीय पक्ष खरोखर सामान्य नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे दिसत नाही.

म्हणून, नागरिकांनी मतदान करताना जात, धर्म, आणि भावनांवर आधारित निर्णय न घेता राजकीय पक्षांची शैक्षणिक, आर्थिक, आणि सामाजिक कामगिरी विचारात घेतली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समान मतदानाचे हक्क फक्त मतदानपुरते मर्यादित ठेवू नये, तर त्यातून आपले भवितव्य निश्चित करणारे शहाणपणाने निर्णय घ्यावे.

संपादक अमोल भालेराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *