ठाणे: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला. हरिनिवास येथील दत्त मंदिर आणि नौपाडा येथील घंटाळी देवी मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी घर चलो अभियान सुरू केले.
यावेळी भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, निवडणूक प्रमुख सुभाष काळे, माजी नगरसेवक सूनेश जोशी, परिवहन सदस्य विकास पाटील, मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर, प्रभाग अध्यक्ष रोहित गोसावी आणि इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अभियानाच्या अंतर्गत, आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील घरोघरी जाऊन पत्रके वाटली आणि नागरिकांचा आशिर्वाद घेतला. नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला. गेल्या दहा वर्षांत केळकर यांनी नागरिकांच्या विविध समस्या सोडवत नागरी सुविधा, एसआरए प्रकल्प, धोकादायक इमारतींचे पुनर्विकास आणि आरोग्य, शिक्षण, गॅस जोडणी यांसारख्या सेवांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असे नागरिकांनी सांगितले.
अभियानाचा पहिला दिवस विविध भागांत उत्साहाने साजरा झाला. बाळकूम नाका, वाल्मिकी मंदिर, पाटील चौक, गोकुळ नगर आणि इतर भागांत शेकडो नागरिकांनी केळकर यांना पाठिंबा दिला.