राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) पहिल्या यादीत भाजपामधून नुकतेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या तीन महत्त्वाच्या नेत्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
समरजीत घाटगे – कागल विधानसभा मतदारसंघ कागल विधानसभा मतदारसंघातून भाजपामधून आलेले समरजीत घाटगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कागलमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
कृपया प्रसिद्धीसाठी…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/MGEckJzGI3
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 24, 2024
संदीप नाईक – बेलापूर विधानसभा मतदारसंघ बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेल्या संदीप नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या विरोधात भाजपाने मंदा म्हात्रे यांना मैदानात उतरवले आहे. बेलापूरमध्ये आता भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात तीव्र संघर्ष होणार आहे.
हर्षवर्धन पाटील – इंदापूर विधानसभा मतदारसंघ इंदापूर मतदारसंघातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात अजित पवार यांच्या गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे इंदापूरमध्येही राष्ट्रवादीतील दोन गटांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
या पहिल्या यादीने आगामी विधानसभा निवडणुकीतील वातावरण तापले असून, हे उमेदवार आपल्या पक्षासाठी किती प्रभावी ठरतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.