महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात सध्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघ चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. येथे महाविकास आघाडी आणि महायुतीने अद्याप आपला उमेदवार निश्चित केलेला नाही, परंतु मनसे आणि एमआयएमने मात्र आपले उमेदवार घोषित केले आहेत. यामुळे सर्वच पक्षांचे नेते, कार्यकर्ते, आणि मतदार राजकीय बातम्यांवर तसेच मोबाइलच्या स्क्रीनवर नजर लावून आहेत.
वर्सोवामध्ये बरीच राजकीय समीकरणे आखली जात आहेत. मतदारसंघाच्या कोपऱ्यापासून ते चहाच्या टपऱ्यांवर निवडणुकीची जोरदार चर्चा आहे – कोण निवडून येईल, बंडखोरी कोठे होईल, आणि अंतिम निकाल कसा लागेल याबाबत सर्वत्र चच्रेचा माहोल आहे. निवडणूक निरीक्षक आणि अभ्यासक सध्या मोठ्या उत्सुकतेने राजकीय गणितांचा अंदाज बांधत आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील स्पर्धा अधिक तीव्र होत आहे. या दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीची छाया दिसून येत आहे, आणि हे अधिकच महत्त्वाचे ठरते. अनेक इच्छुकांनी गुपचूप नामांकन अर्ज आणून गुलदस्त्यात ठेवला आहे. यामुळे जो उमेदवार अंतिमरित्या निवडला जाईल त्यावेळी बंडखोरीचा महापूर येण्याची दाट शक्यता आहे. या बंडखोरीमुळे कोणताही उमेदवार निवडून आला, तरी तो अत्यंत कमी मतांच्या फरकाने विजयी होईल, असा अंदाज आहे.
यंदाच्या निवडणुकीत वर्सोवामध्ये नागरिकांची दिवाळी जोरदार साजरी होणार, हे निश्चित आहे, कारण प्रत्येक राजकीय हालचाल, चर्चा आणि चर्चांचा दरम्यान इथल्या मतदारांना विविध पक्षांच्या योजनांमध्ये त्यांचा हक्क आणि महत्व ठळकपणे अनुभवायला मिळणार आहे.
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक
अमोल भालेराव, मुंबई