वर्सोवा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. गेल्या काही दिवसांपासून वर्सोवा विधानसभा सीट काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चांना पुर्णविराम देत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख हारून खान यांची उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली आहे.
हारून खान यांची निवड झाल्यामुळे वर्सोवा विधानसभेत मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या उमेदवारपदाची घोषणा होताच, काँग्रेसचे इच्छुक उमेदवार नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते व मतदार यावर कशी प्रतिक्रिया देतात, हे महत्त्वाचं ठरणार आहे.
आता प्रश्न उभा राहतो तो म्हणजे काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी या निर्णयाला पाठींबा देऊन एकजूट दाखवायची का बंडखोरीचा मार्ग निवडायचा? हा मुद्दा पुढील निवडणुकीत विरोधकांना मोठा फायदा मिळवून देऊ शकतो.
यामुळे वर्सोवा विधानसभेतील राजकीय वातावरण तापलं आहे, आणि आगामी निवडणुकीत इथल्या लढतीवर सर्वांचे लक्ष राहणार आहे.