अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सावंत यांना उमेदवारीची संधी मिळाली होती, परंतु त्यांनी ती नाकारली आहे. सावंत यांनी स्पष्ट केले की त्यांना अंधेरीऐवजी वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट मिळावे, कारण त्यांनी तिथेच दीर्घकाळापासून जनतेसाठी कार्य केले आहे. काँग्रेसने अंधेरी पश्चिममधून सावंत यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले असतानाही, त्यांनी ही उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी या निर्णयामागील कारण सांगताना असे स्पष्ट केले, “मी वांद्रे पूर्वमध्ये वर्षानुवर्षे काम केले आहे. तिथेच मला जनतेच्या प्रश्नांसाठी लढता येईल, म्हणून मला त्या मतदारसंघातूनच तिकीट मिळावे, अशी माझी इच्छा आहे. अंधेरीतील उमेदवारीसाठी स्थानिक उमेदवारास संधी मिळावी, असा माझा आग्रह आहे.”
सावंत यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या अंतर्गत चर्चांना वेग आला आहे, आणि आता अंधेरी पश्चिममधील तिकीट मिळण्याची शक्यता काँग्रेसचे माजी आमदार अशोक भाऊ जाधव यांच्यासाठी वाढली आहे. जाधव हे अंधेरीतील लोकप्रिय नेते असून त्यांना स्थानिक पातळीवर मजबूत पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता अधिक आहे.
सचिन सावंत यांनी वांद्रे पूर्वमध्ये पुनर्विकास, रेल्वे समस्यांचे निराकरण, स्थानिकांच्या हक्कांचा सवाल, आणि समाज कल्याणासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे, ते वांद्रे पूर्वमधील निवडणुकीचे तगडे उमेदवार ठरू शकतात, मात्र सावंत यांनी सांगितले की, हा निर्णय पक्षाच्या हितासाठी घेतला असून, नाराजी दर्शवण्यासाठी
नाही.