बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण प्रकरण तापले आहे. न्याय मिळवण्यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह अनेक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप मोकाट असून त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. “ही केस फास्ट टॅग कोर्टात चालवावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यात न्यायव्यवस्था सुरळीत ठेवण्याचा निर्धार
सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, “सरकारच्या तपास यंत्रणा योग्य दिशेने काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा संवेदनशील मुख्यमंत्री लाभल्याने न्याय मिळण्याची खात्री आहे.”
त्यांनी पुढे सांगितले, “महाराष्ट्रातील जनतेची शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी.”
“मी नाराज नाही, आम्ही देवाभाऊंच्या पाठीशी”
सदाभाऊ खोत यांनी सरकारवर विश्वास दाखवत सांगितले, “गेल्या ५० वर्षांतील काँग्रेस राजवटीत गावगड्यांची फसवणूक झाली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राला योग्य दिशा मिळेल.”
ते पुढे म्हणाले, “आम्हाला पदाची अपेक्षा नाही, आम्ही खळं राखणारे शेतकरी आहोत, त्यामुळे देवाभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.”
संतोष देशमुख हत्या प्रकरण ही राज्याच्या जनतेच्या भावनांना हात घालणारी घटना ठरली आहे. या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी सर्व स्तरांवरून आवाज उठत आहे.