बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) निष्पक्षतेवर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीवर खळबळजनक आरोप केले आहेत.
वाल्मिक कराडच्या जवळच्या अधिकाऱ्यांचा समावेश?
या प्रकरणात एसआयटीमध्ये वाल्मिक कराड यांचे जवळचे मानले जाणारे पोलीस अधिकारी महेश विघ्ने यांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पीएसआय महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना ते दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
एसआयटीच्या सदस्यांवर विरोधकांचा आक्षेप
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीमध्ये नेमलेले अधिकारी आरोपीच्या जवळचे आहेत. अशा परिस्थितीत ते कशा प्रकारे निष्पक्ष तपास करतील? पीएसआय महेश विघ्ने याने निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यासारखे काम केले आहे.”
खासदार बजरंग सोनवणे यांनीही या प्रकरणात आवाज उठवला आहे. त्यांनी मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार दाखल केली असून, “जर आरोपीचा मित्रच तपास करणार असेल, तर तपासाचा निष्कर्ष कसा विश्वासार्ह असेल?” असा सवाल उपस्थित केला आहे.
संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील… pic.twitter.com/5BThMPUvng
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2025
दुसऱ्या अधिकाऱ्यावरही गंभीर आरोप
आव्हाड यांनी आणखी एका फोटोचा उल्लेख करत एसआयटीतील मनोजकुमार वाघ यांच्यावरही आरोप केला आहे. वाघ गेल्या १० वर्षांपासून बीड स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असून, तेही वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचे आरोप
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले की, “तपास पथकात आरोपीच्या जवळच्या लोकांचा समावेश असल्यास न्याय मिळण्याची शक्यता कमी होते.”
SIT निष्पक्ष चौकशी करणार ?
संतोष देहमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मधे हे महेश विघ्ने ?
ह्या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का ?
बीड चे अधिकारी बीड च्या boss ची निष्पक्ष चौकशी करणार ?
आणि एक अधिकारी मनोज वाघ देखील कराड यांचे निकरवर्ती आहेत असे माध्यमांमधून कळते pic.twitter.com/8PTAq1Y1Nx
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 5, 2025
सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटीच्या तपासावर विरोधकांनी गंभीर शंका व्यक्त करत राज्य सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. आता या प्रकरणात सरकार काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.