नवरात्र घटस्थापना निमित्त उपवास केलेल्या भक्तांवर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीचा कोप झाला. जिंतूर तालुक्यातील पुंगळा या गावातील जवळपास 35 जणांना भगर पिठाची भाकर खाल्ल्याने विषबाधा झाली असल्याची घटना आज दि. 04/10 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. सर्व बाधितांना सरकारी आणि खाजगी रुगणालयात भरती करण्यात आले होते.
अधिक माहिती अशी की, नवरात्र निमित घटस्थापनेचा उपवास असल्याने पुंगळा गावातील नागरिकांनी गावातील किराणा दुकानातून भगर पीठ खरेदी केले होते. रात्री उपवास असल्याने रात्री भगर पिठाची भाकर खाण्यात आली आणि काही तासांतच उलटी मळमळ आणि चक्कर येऊन अंगाचा थरकाप सुरू झाल्याने जिंतूर येथील ट्रामा केअर आणि काही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिंतूर तहसीलदार राजेश सरवदे यांनी रुग्णालयात जाऊन बाधीत नागरिकांना भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली. सद्या सण उत्सवाचे वातावरण असल्याने तालुक्यात असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून नागरिक आणि व्यापाऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले.
रात्री उशिरा जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांनी रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली आहे. विष बाधितांवर जिंतूर ट्रामा केअर सेंटरचे डॉ. शिवाजी हरकळ आणि परिचारिका राठोड, खवणे गंगाधर पालवे रुग्णसेवक नागेश आकात यांनी उपचार केले. दरम्यान जिंतूर सर्व विष बाधितांची प्रकृती सद्या स्थिर असून प्रकृतीत सुधार होत आहे. शहरातील साईबाबा मंदिर परीसरात राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेला देखील विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.