रामटेक : २०१९ मध्ये अपक्ष निवडून आलेल्या आमदार आशिष जयस्वाल यांना शिवसेनेत सामील करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. यामुळे रामटेक मतदारसंघात भाजपामध्ये नाराजीचे वातावरण आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जयस्वाल यांना उमेदवारी देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जयस्वाल यांच्या उमेदवारीला विरोध करत महायुतीने दुसरा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी रामटेक येथील गंगाभवन येथे भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ५१२ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश ठाकरे यांनी ही माहिती दिली.
मेळाव्यात माजी आमदार डी. एम. रेड्डी यांच्यावर पक्षाने केलेली निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. रेड्डी यांनी संवाद साधताना सांगितले की, “२०१९ मध्ये युतीचा धर्म न पाळणाऱ्या आणि भाजप कार्यकर्त्यांची गळचेपी करणाऱ्या उमेदवाराला पुन्हा उमेदवारी देणे अयोग्य आहे.” रेड्डींनी याबाबत भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांना निवेदनही पाठवले आहे.
रेड्डी यांनी निवडणुकीबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केली नसून, कार्यकर्त्यांच्या निर्णयानुसार आपली भूमिका जाहीर करू असे त्यांनी सांगितले.